Thursday, December 27, 2012

भारतीय (संस्कृती)???

फार दिवसांपासून भारतीय संस्कृती बद्दल लिहायचा विचार करत होते. पण इतके दिवस असं वाटत होतं की विषय इतका निरर्थक आहे की त्याबद्दल लिहिण्यात आपली शक्ती आणि बुद्धी कशाला वाया घालवायची? पण आता मात्र असं वाटतय की ज्या भारतीय संस्कृतीच्या नावाने त्याचे स्वयंघोषित संरक्षक गले काढत असतात त्यांना इतकी तरी जाणीव करून दिली पाहिजे की ते एक अत्यंत शिळी आणि नि:सत्त्व गोष्ट विकायचा प्रयत्न करतायत. याबरोबरच मी outdated पण म्हणणार होते. पण माझ्या लक्षात आलं की ज्यांना श्रुतीस्मृतीपुराणोक्त असण्यातच मोठेपणा वाटतो त्यांना uptodate असण्याच काय कौतुक असणार आणि outdated असण्याचं तरी काय सोयरसुतक असणार?


भारतीय समाज आणि संस्कृती वरचा माझा राग अत्यंत वैयक्तिक आहे. मला माझ्या क्षमता पूर्णपणे वापरता येत नाहीत. माझं आयुष्य आनंदाने जगता येत नाही. अनेक छोट्या छोट्या आनंददायक अनुभवांपासून दूर रहावं लागत. आणि या सगळ्याचं कारण एकच... भारतीय समाज आणि संस्कृती माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये करतात. मी काही रोज चंद्राची सफर करण्याची स्वप्नं बघत नाही. पण कुठेतरी फिरायला गेलेलं असतांना पाण्याचा डोह दिसतो. बरोबरची पुरुष मंडळी सहज कपडे काढून पाण्यात उतरतात. मनसोक्त पोहोतात. आणि मी? मलाही तितकंच चांगलं पोहोता येत. मलाही तितकच उकडत असतं. पण मी मात्र पोहायचं नाही. अगदी फारच पोहायचं असेल तर सगळे कपडे अंगावर तसेच ठेऊन पोहायचं. आणि तरीही आजूबाजूच्या गावातली रिकामटेकडी मुलं आणि माणसं गावात सर्कस आल्यासारखे भोवती गोळा होणार. काहीतरी कॉमेंट करणार. १०० पैकी ९८ वेळा ती कॉमेंट अश्लील असणार... मग माझा आणि माझ्या बरोबरच्यन्चा मूड जाणार. काहीतरी भांडणं होणार. मग तसेच ओलेगच्च कपडे अंगावर वागवत गाडीत बसायचं. आणि हे सगळ टाळायच असेल तर पाण्यात फक्त पाय बुडवायचे... तेवढं पाउलभरच जगायचं...

संध्याकाळी बाहेर पडल्यावर गावातली मैदानं दिसतात. सगळीकडे मुलं (मुलगे) खेळत असतात. मलाही आवडतं मोकळ्या हवेत खेळायला. पण मी नाही खेळायचं. कारण यांच्या थोर भारतीय संस्कृतीत नारीने व्यायाम करण्यासाठी काही सिस्टीम नाहीच आहे. बरोबर खेळायला कोणी मुली कधी येत नाहीत. कारण त्यांच्या भारतीय आई वडिलांनी त्यांच्यावर दिवेलागणीच्या आत घरात येण्याचे संस्कार केलेले असतात. त्या मुली अत्यंत मरतुकड्या राहिल्या तरी चालेल, पण त्यांनी संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे.

रात्रीच्या आकाशाखाली एकटीने पहुडण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. एकटीने सायकल वर आरामात फिरायला जावसं वाटण्यात काय चूक आहे? पण असं जरा कुठे गावाबाहेर गेलं की कोणीतरी काहीतरी करून माझा आनंद नासवणार हे नक्की असत.

अशा खूप लहान लहान गोष्टी असतात ज्यामुळे आपल आयुष्य समृद्ध होत असत. पण या गोष्टी करायला, निखळ आनंदाने जगायला तुमच्या भारतीय संस्कृतीत कुठलीच जागा नाहीये. सगळीकडे परंपरेचा काच आणि संस्कृतीची कटकट आहेच. मला कधी कधी खरोखर असं वाटत की आपल्याकडे भरपूर बुद्धीमत्ता असूनही कुठल्यातरी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत देशात जायचा विचार आपण केला नाही ही चूक झाली की काय?

लठ्ठ पगाराच्या नोकरीचा मोह मला कधीच पडणार नाही. पण मनसोक्त जगण्याच्या आनंदाच्या मोहापायी मात्र मी हा देश सोडून जाण्याचा अनेक वेळा विचार करते. आणि मला खात्री आहे, की आज ज्या ब्रेन ड्रेन बद्दल इतका तावातावाने लिहिला आणि बोललं जात त्यामागे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही मोकळ्या आणि समृद्ध जगण्याची आस असणार आहे.

5 comments:

  1. सत्यवचन!!!

    मुलीनी खेळणे किवा पोहणे असंस्कृत आहे, पण मुलांनी त्यावर कॉमेंट करणे नाही. :(

    यामध्ये दुखद बाब अशी आहे कि आमच्या वयाच्या आयाही (आणी मम्म्याही) आपल्या मुलीना हेच शिकवतात.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे, मला तुझे काही मुद्दे पटतात, आणि काही पटत नाहीत.

    तू ज्याला 'तुमची' भारतीय संस्कृती म्हणतेस, ती तुझी, माझी, आणि अशा सगळ्यांची आहे. त्यातले वेगेवेगळे भाग आपल्याला खटकतात, आणि ते दुरुस्त करायचा आपण प्रयत्न करतो, हे नक्की. पण त्या संस्कृतीला as a whole नाकारणं मला पटत नाही. आजच्या काळात जे स्वातंत्र्य तुला आहे, ते २५ किंवा ५० वर्षांपूर्वी नव्हतं, हे तुला माहिती आहेच. शेवटी समाज काही एखाद्या रात्रीत बदलत नाही. तो हळू हळू, पण निश्चितपणे बदलतो आहे. मला वाटतं कि जगातल्या अनेक संस्कृतीन्पेक्षा 'बदललं पाहिजे', आणि 'बदलता येतं' ही तत्व भारतीय समाजानी जास्त मोकळेपणानी स्वीकारली आहेत. पण समाज बदलायचा असेल तर फक्त त्याला शिव्या देवून, त्याचे दोष दाखवून चालत नाही.

    कुठल्यातरी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत देशात जायचा विचार करायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. पण तिथे तू परकी, उपरी असशील. शिवाय त्यांच्या संस्कृतीचेही काही काच, कटकटी असतीलच. कारण संस्कृती म्हणजे शेवटी काय? तर वागण्याची एक सर्वसाधारणपणे सर्वमान्य पद्धत. ती ज्यांना जशीच्या तशी, १००% मान्य नाही, त्यांना ती टोचणार हे नक्की. त्यातून तुझ्या कल्पनेतला स्वर्ग तुला सापडला, तर फारच छान!

    शेवटी आपल्यासारख्यांना पर्याय कायकाय असतात? (१)आहे या परिस्थितीला शिव्या देत, कुढत राहायच (२)'तुम्ही आणि तुमची संस्कृती खड्ड्यात जा' असं म्हणून नव्या ठिकाणी सगळं आपल्या मनासारखंच असेल, अशी अशा करायची; आणि (३)आहे या परिस्थितीचा स्वीकार करून, कधी जुळवून घेवून तर कधी झुगारून देवून, आनंदाने जगायचं; आणि ही बंधनं दररोज थोडी थोडी कमी व्हावी म्हणून प्रयत्न करायचे.

    तू कितीही त्रागा केलास, तरी तू शेवटचाच पर्याय स्वकाराशील अशी खात्री वाटते.

    ReplyDelete
  3. अतुल,

    बाकीच्या मुद्द्यांवर आपण बोलत राहूच. पण मी तुला नक्की सांगते की मी जे मुद्दे मांडले आहेत, त्यातली मानसिकता आणि बलात्काराची मानसिकता यात फक्त संधीचा अंतर आहे. आणि रोज रस्त्यावर बाहेर पडल्यावर जे अनुभव येतात ते इथून निघून जावसं वाटण्यासाठी पुरेसे आहेत. आपल्या देशातल्या ९० टक्के पुरुषांची नजर २४ तास वखवखलेली असते. त्यांच्याबरोबर हा देश आणि पर्यायाने माझ आयुष्य शेअर करण्याची माझी इच्छा नाही. हे मेणबत्त्या घेउन जाणारे, त्यात येणारे अ.भ.वि.प. सारखे कार्यकर्ते, कुठलेही १० पेक्ष जास्त पुरुष एका ठिकाणी येउन बिगर लैंगिक विचार करत असतील यावर विश्वास ठेवणं फार अवघड आहे. माझे आजवरचे गर्दीचे अनुभव मला तसं सांगत नाहीत. त्यामुळे मी तिसरा पर्याय निवडीन का नाही ते माहीत नाही. आत्तापर्यंत तो निवडलाय. पुढचं सांगता येत नाही.
    आणि हो. समाज निश्चित बदलतो आहे. तो जास्त हिंस्त्र आणि जास्त असंस्कृत होतो आहे. आणि हे मी फक्त लैंगिक छळवणूक या एकाच संदर्भात बोलत नाहीये. लिखाणापासून fasion पर्यंत अनेक गोष्टींबाबत माझं हेच मत आहे. आपल्याकडे एकूणच नि:सत्त्व विपुलता आलेली आहे.
    तिसरी गोष्ट, भारतीय समाजाने 'बदलता येतं' आणि 'बदललं पाहिजे' हे स्वीकारलंय, पण ते फक्त पुरुषांच्या बाबतीत. बायकांचं आयुष्य १०० वर्षांपूर्वी होतं तसाच आहे. कपडे, कामं, मारहाण, समाजातलं स्थान, घरातलं स्थान, प्रतिष्ठा... काय बदललंय? पुरुषांचे कपडे, कामं, समाजातला मोकळेपणा हे बदललाय. जे बदलायला पाहिजे, ते बदललेला नाही. आणि सुखासुखी बदल्नाराही नाही. भारतीय समाज आणि संस्कृती फार जास्त भामटी आणि दुटप्पी आहे. इथे बळी तो कान पिळी हे एकाच सूत्र चालत. मग ते घरात असो नाहीतर राजकारणात.

    ReplyDelete
  4. गौरी आणि अतुल ,
    तुमच्या दोघांचे हि मत वाचले. त्यातले काही मुद्दे मला पटले आणि काहींवर थोडे लिहावेसे वाटले.
    १. भारतीय संस्कृती हि सर्वांची आहे :
    पण आजच्या काळात तरी ह्या वाक्यात तेवढेसे तथ्य दिसत नाही.
    गौरी म्हणते तसे ती पुरुषांची जास्त आहे. स्त्रियांचे ह्या संस्कृतीतले स्थान, जे पूर्वी फार बळकट आणि उच्चतम होते ते काळान्वये हिरावून घेण्यात आले. म्हणूनच कर्वे, रानडे ह्या सारख्या धुरिणीना ह्या क्षेत्रात आपले आयुष्य वेचावे लागले.
    २. समाज एका रात्रीत बदलत नाही. समाज बदलायचा असेल तर फक्त त्याला शिव्या देवून, त्याचे दोष दाखवून चालत नाही.
    मान्य. निदान प्रत्येक पिढीतले काही लोक हे समाज बदलण्याचा प्रयन्त करत असतात. फक्त सध्या जे बदल ठळकपणे दिसत आहेत ते आशादायी नक्कीच नाहीत. ह्यावर विचार मंथन सातत्याने होणे गरजेचे आहे.
    ३. भारतीय समाज आणि संस्कृती फार जास्त भामटी आणि दुटप्पी आहे.
    मान्य. मी गेली ७ वर्षे नोकरी निमित्त विदेशात वास्तव्य करून आहे. मला भारतीय असण्याचा अभिमान आहे पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांचे समर्थन करणार नाही.
    अ. आपल्याकडे स्त्री-संरक्षण हा सध्या सगळ्यात मोठा आणि अतिशय चिंतेचा विषय आहे. निदान ह्या बाबतीत मला स्वर्ग सापडला आहे.
    ब. खालावलेले स्त्रियांचे कपडे हा अतिशय नगण्य विषय ,ज्याला अवास्तव महत्व दिले जाते , त्यापेक्षा खालावलेली वैचारिक पातळी उंचावणे जास्त महत्वाचे नाही का? अंग झाकण्यासाठी अंतर्वस्त्रे घालायची आणि मग ती वस्त्रे झाकायला अजून कपडे ....अजून मुलीना रागवायचे पाय सोडून सरळ बस ...किती हास्यास्पद आहे त्यापेक्षा विचार आणि नझर बदला
    लिहिण्या सारखे बरेच काही सध्या तरी इथेच थांबते

    ReplyDelete
  5. Ashwini... Ya reply baddal tuze far far abhar. karan mi jya goshti gruhit dharun chalale hote tya kharya ahet asa tu swat:chya anubhavatun sangte ahes.
    Eka mulila ek sadha saral samruddha ayushya aj durdaiwane bharatat jagta yet nahi he satya ahech. Pan te kuthech nahi asa nahiye. Itar kahi deshat te jagna milu shakta yacha artha te shakya ahe.
    Mag aplyakade ka nahi? Tar Bharatiye sanskruti atyant dhongi, labad ani dutappi ahe. Ani baykanchya babtit parakotichi asahishnu ahe. Ewdhach nahi, tar baine kayam du:khat ani kashtat jagawa yasathi satat prayatnasheel ahe ewdhach maza mhanna ahe.

    ReplyDelete