Thursday, December 27, 2012

भारतीय (संस्कृती)???

फार दिवसांपासून भारतीय संस्कृती बद्दल लिहायचा विचार करत होते. पण इतके दिवस असं वाटत होतं की विषय इतका निरर्थक आहे की त्याबद्दल लिहिण्यात आपली शक्ती आणि बुद्धी कशाला वाया घालवायची? पण आता मात्र असं वाटतय की ज्या भारतीय संस्कृतीच्या नावाने त्याचे स्वयंघोषित संरक्षक गले काढत असतात त्यांना इतकी तरी जाणीव करून दिली पाहिजे की ते एक अत्यंत शिळी आणि नि:सत्त्व गोष्ट विकायचा प्रयत्न करतायत. याबरोबरच मी outdated पण म्हणणार होते. पण माझ्या लक्षात आलं की ज्यांना श्रुतीस्मृतीपुराणोक्त असण्यातच मोठेपणा वाटतो त्यांना uptodate असण्याच काय कौतुक असणार आणि outdated असण्याचं तरी काय सोयरसुतक असणार?


भारतीय समाज आणि संस्कृती वरचा माझा राग अत्यंत वैयक्तिक आहे. मला माझ्या क्षमता पूर्णपणे वापरता येत नाहीत. माझं आयुष्य आनंदाने जगता येत नाही. अनेक छोट्या छोट्या आनंददायक अनुभवांपासून दूर रहावं लागत. आणि या सगळ्याचं कारण एकच... भारतीय समाज आणि संस्कृती माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये करतात. मी काही रोज चंद्राची सफर करण्याची स्वप्नं बघत नाही. पण कुठेतरी फिरायला गेलेलं असतांना पाण्याचा डोह दिसतो. बरोबरची पुरुष मंडळी सहज कपडे काढून पाण्यात उतरतात. मनसोक्त पोहोतात. आणि मी? मलाही तितकंच चांगलं पोहोता येत. मलाही तितकच उकडत असतं. पण मी मात्र पोहायचं नाही. अगदी फारच पोहायचं असेल तर सगळे कपडे अंगावर तसेच ठेऊन पोहायचं. आणि तरीही आजूबाजूच्या गावातली रिकामटेकडी मुलं आणि माणसं गावात सर्कस आल्यासारखे भोवती गोळा होणार. काहीतरी कॉमेंट करणार. १०० पैकी ९८ वेळा ती कॉमेंट अश्लील असणार... मग माझा आणि माझ्या बरोबरच्यन्चा मूड जाणार. काहीतरी भांडणं होणार. मग तसेच ओलेगच्च कपडे अंगावर वागवत गाडीत बसायचं. आणि हे सगळ टाळायच असेल तर पाण्यात फक्त पाय बुडवायचे... तेवढं पाउलभरच जगायचं...

संध्याकाळी बाहेर पडल्यावर गावातली मैदानं दिसतात. सगळीकडे मुलं (मुलगे) खेळत असतात. मलाही आवडतं मोकळ्या हवेत खेळायला. पण मी नाही खेळायचं. कारण यांच्या थोर भारतीय संस्कृतीत नारीने व्यायाम करण्यासाठी काही सिस्टीम नाहीच आहे. बरोबर खेळायला कोणी मुली कधी येत नाहीत. कारण त्यांच्या भारतीय आई वडिलांनी त्यांच्यावर दिवेलागणीच्या आत घरात येण्याचे संस्कार केलेले असतात. त्या मुली अत्यंत मरतुकड्या राहिल्या तरी चालेल, पण त्यांनी संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे.

रात्रीच्या आकाशाखाली एकटीने पहुडण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. एकटीने सायकल वर आरामात फिरायला जावसं वाटण्यात काय चूक आहे? पण असं जरा कुठे गावाबाहेर गेलं की कोणीतरी काहीतरी करून माझा आनंद नासवणार हे नक्की असत.

अशा खूप लहान लहान गोष्टी असतात ज्यामुळे आपल आयुष्य समृद्ध होत असत. पण या गोष्टी करायला, निखळ आनंदाने जगायला तुमच्या भारतीय संस्कृतीत कुठलीच जागा नाहीये. सगळीकडे परंपरेचा काच आणि संस्कृतीची कटकट आहेच. मला कधी कधी खरोखर असं वाटत की आपल्याकडे भरपूर बुद्धीमत्ता असूनही कुठल्यातरी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत देशात जायचा विचार आपण केला नाही ही चूक झाली की काय?

लठ्ठ पगाराच्या नोकरीचा मोह मला कधीच पडणार नाही. पण मनसोक्त जगण्याच्या आनंदाच्या मोहापायी मात्र मी हा देश सोडून जाण्याचा अनेक वेळा विचार करते. आणि मला खात्री आहे, की आज ज्या ब्रेन ड्रेन बद्दल इतका तावातावाने लिहिला आणि बोललं जात त्यामागे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही मोकळ्या आणि समृद्ध जगण्याची आस असणार आहे.