रिझल्ट
लागला, पाऊस आला, वाढदिवस झाला, त्यानिमित्ताने मान्सून सेलमधे भरपूर शॉपिंग केलं,
लायसन्स मिळालं आणि खूप वाट बघून शेवटी एकदाचं कॉलेज सुरु झालं...
कॉलेजचा
पहिला दिवस. जान्हवी कॉलेजला जाण्यासाठी खूप लौकर उठली होती. खूप आवरायचं होतं तिला.
केस धुवायचे होते, ब्लो ड्राय करुन सेट करायचे होते, मेकअप करायचा होता, नुकतेच घेतलेले
लेटेस्ट फॅशनचे कपडे घालून तयार व्हायचं होतं... आणि तिथेच सगळी गडबड होती.
तिने
मैत्रिणींबरोबर शॉपिंग करतांना अनेक वेगवेगळे कपडे घेतले होते. त्यात हॉल्टर नेकचा
टॉप, लो वेस्ट जीन्स, ए-लाईन फ्रॉक, रॅप अराऊंड स्कर्ट असं खूप काय काय होतं. आणि त्यांच्या
सगळया ग्रूपने ठरवलं होतं की पहिल्या दिवशी रॅप अराऊंड स्कर्ट घालायचा.
जान्हवीने
तो घालून पाहिला. पण तिला काही तो आवडला नाही. जरा वारा आला की त्याची मोकळी बाजू फडफडत
होती. कॉलेजमधे जर जोरात वारा आला तर? जान्हवीला काही ती आयडिया फारशी आवडली नाही.
पण सगळया मैत्रिणींचं तर ठरलेलं होतं... आता काय करणार?
शेवटी
जान्हवीने मनाविरुध्द तो स्कर्ट घातला, आणि 'रिस्क नको' असं म्हणून त्याच्या फडफडणाऱ्
या बाजूला अर्ध्यातून पिन लाऊन टाकली. पण मनातून तिला तो प्रकार काही आवडलेला नव्हता
त्यामुळे तिला त्या स्कर्टमधे वावरतांना अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हतं. कट्टयावर बसतांना,
चालतांना ती सारखी कॉन्शस होत होती. चालतांनाही ती स्कर्टची मोकळी बाजू सतत हाताने
सारखी करत होती.
कॉलेजचा
पहिलाच दिवस असल्याने कोणीच लेक्चरला बसलं नाही. दिवसभर सगळयाजणी भटकल्या, धमाल केली.
दुपारनंतर सगळयाजणी फ्रेश व्हायला वॉशरुममधे गेलेल्या असतांना जान्हवीला तिच्या दोन
मैत्रिणींचं बोलणं ऐकू आलं.
''तू
बघितलंस का? जान्हवीला हा स्कर्ट सूट नाही करत.''
''हो
गं. बहुतेक ती खूप बारीक आहे ना त्यामुळे असेल.''
हे
बोलणं ऐकून जान्हवी मनात खूप चडफडली. मुळात तिला तो स्कर्ट घालायचा नसतांना सगळयांचं
ठरलंय म्हणून तिने तो घातलेला होता आणि एवढं करुन त्याच मुली तो तिला कसा चांगला दिसत
नाही याबद्दल आपसात चर्चा करत होत्या. जान्हवीचा संताप झाला आणि तिने त्या स्कर्टवर
कायमची फुली मारली. घरी येऊन ती तो स्कर्ट हातात घेऊन खूप वेळ रड रड रडली...
तिच्याकडे
एक बॅग भरुन असे फुली मारलेले कपडे होते. हे कपडे तिला सूट होत नाहीत म्हणून तिने बाजूला
ठेवलेले होते. आणि त्यात सगळया प्रकारचे कपडे होते. जीन्स होत्या, स्कर्ट्स होते, फ्रॉक्स
होते, पंजाबी ड्रेस होते, लेगिंग्ज आणि कुर्ती होत्या. हे कपाट पाहिलं की आपल्याला
एकूणात काहीच चांगलं दिसत नाही याबद्दल जान्हवीची खात्री पटायची. ती बॅग हे तिच्या
आयुष्यातल्या एका कायमच्या फ्रस्ट्रेशनचं कारण होती. कधीही खोली आवरतांना तिला ती बॅग
दिसली तरी तिला मनापासून वाईट वाटायचं. कारण ते सगळे कपडे तिला घेतांना खरं आवडलेले
होते आणि ते तिच्या बहुतेक सगळया मैत्रिणींना चांगलेही दिसत होते. ''मग मलाच का नाही
ते चांगले दिसत?'' या विचाराने तिच्या डोक्याचा अनेक वेळा भुगा झालेला होता.
आणि
ज्यार्थी आपल्याला काहीच चांगलं दिसत दिसत नाही त्याअर्थी आपण मुळातच चांगले दिसत नाही
याबद्दलही तिची खात्री पटलेली होती. आणि आपण दिसायला चांगले नाही या कल्पनेने तिला
भयंकर वाईट वाटायचं. कॉलेजमधल्या इतर मुली कशा छान दिसायच्या, छान रहायच्या आणि जान्हवी
मात्र त्यांच्यात कायमच अवघडलेली असायची.
आणि
एकदा आपण चांगलेच दिसत नाही म्हटल्यावर काय, तिच्या सगळया कॉलेज लाईफचा मूडच बदलून
गेला. तिने फार लोकांमधे जाणं टाळायला सुरुवात केली, फॅशन्स ट्राय करणं सोडून दिलं,
तिने सरसकट पंजाबी सूट घालायला सुरुवात केली कारण त्याच्या ओढणीने तिला हवं तसं अंग
झाकून घेता यायचं. शिवाय तिला पंजाबी सूट घातल्यावर अनेकदा लोकांनी सांगितलं होतं की
ते तिला चांगले दिसतात. पंजाबी सूट चांगले दिसतात म्हणून तिला आवडायचे. पण ते फार काकूबाई
दिसतात असंही वाटायचं. तिला खरं तर इतर मुलींसारखी फॅशन करायची फार इच्छा होती. पण
'चांगलं दिसत नाही ना...' असं स्वत:ला सांगून तिने ते कायमच टाळलं होतं.
तिचं
कॉलेज संपलं. आणि तिने पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतली. तिचं आयुष्य असंच सरळ रेषेत
चालू राहिलं असतं; पण मधेच तिचा दादा प्रेमात पडला...
विदिशाशी
तिची खूपच गट्टी जमली. इतकी की त्या दोघी त्याला टाळून कॉफी प्यायला भेटायला लागल्या.
असंच एकदा तिच्या वाढदिवसाला विदिशा तिला म्हणाली,
''चल
आपण तुला जीन्स घेऊ.''
जान्हवी
म्हणाली, ''नको गं. मी घालत नाही जीन्स.''
''का???''
''अगं
मला चांगली नाही दिसत.''
''असं
कोणी सांगितलं तुला?''
''सगळेच
म्हणतात असं. आणि आपलं आपल्याला कळतं ना...''
''हे
बघ... सगळे म्हणतात याला काहीच अर्थ नाही. कोण सगळे? त्यांचा संबंध काय? तुला काय चांगलं
दिसतं यावर त्यांनी कशाला काही मत द्यावं?''
''हो
पण माझं मला तर कळतंच ना...''
''काही
कळत नाही तुला! बावळट! म्हणे जीन्स चांगली दिसत नाही... तू माझ्याबरोबर दुकानात चल,
तिथे मी सांगते ते सगळं ट्राय कर. आणि तरीही तुला ते आवडलं नाही, तर तू म्हणशील ते
मी तुला घेऊन देईन.''
असं
म्हणून विदिशा तिला जवळ जवळ ओढतच दुकानात घेऊन गेली. विदिशाच्या एव्हाना लक्षात आलं
होतं की जान्हवीला अंगप्रदर्शन करणाऱ् या कपडयांमधे कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे
तिने जान्हवीसाठी हाय वेस्ट जीन्स, थोडे ढिल्या फॅशनचे शर्ट्स आणि टॉप्स असं शोधून
काढलं.
ते
कपडे बघून जान्हवी म्हणाली, ''मला खरं म्हणजे असे कपडे आवडतात. पण चांगले दिसत नाहीत
ना म्हणून''
तिचं
वाक्य अर्ध्यातच तोडून विदिशा म्हणाली, ''चांगले दिसतात की नाही ते अजून ठरायचं आहे.
तू एकदा ते कपडे घाल तर खरं. मग बघू आपण.''
तिच्या
आग्रहामुळे जान्हवीने ते कपडे घेतले. मग एकदा विदिशाबरोबरच बाहेर जातांना घालून पाहिले.
ते फारच कम्फर्टेबल होते. इतके, की आपण जीन्स घातली आहे हे थोडया वेळाने जान्हवीच्या
लक्षातसुध्दा राहिलं नाही. मग तिची थोडी भीड चेपली आणि तिने एरवीही जीन्स घालायला सुरुवात
केली.
एका
शनिवारी ती हिंमत करुन कॉलेजला जीन्स घालून गेली. तिथे तिच्याकडे बघून तिची कॉलेजमधली
मैत्रिण म्हणाली,
''अरे
तुझे जीन्स कितनी सूट करती है। इतने दिन क्यूं नहीं पहनती थी? अब सिर्फ अच्छासा हेअरकट
करवाले।''
जान्हवीला
कळेना आपली मैत्रिण खरंच बोलते आहे का चेष्टा करते आहे. पण इतरही 3-4 मैत्रिणींनी तिला
तेच सांगितल्यावर तिचा विश्वास बसला.
तेव्हा
तिला विदिशा सांगत होती ते खऱ् या अर्थाने पटलं. विदिशा तिला सांगत होती की जे कपडे
तुला कम्फर्टेबल वाटतात ते घाल. फॅशनचा विचार करु नको. कारण तुला प्रत्येक फॅशनचे कपडे
चांगले दिसतीलच असं नाही, पण तुला कम्फर्टेबल वाटणारा प्रत्येक कपडा तुला चांगलाच दिसेल.
तिचं म्हणणं अक्षरश: खरं होतं... आज जान्हवी मनापासून
खूष होती... ''बरं झालं आपल्याला विदिशा भेटली आणि आपण तिचं म्हणणं ऐकलं. नाहीतर आपले
कॉलेजचे सगळे दिवस काहीच मजा न करता आपण अक्षरश: वाया घालवले असते. पण आता तसं होणार
नाही. पण आता तसं होणार नाही. कारण कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स हे दोन्ही शब्द एकाच अक्षराने
सुरु होतात हे आपल्याला नीटच कळलंय.''